Tuesday, September 14, 2010

सूर्य - १६

सूर्याच्या आतली आणि बाहेरची थोडी माहिती घेतल्यावर आपण थोडंसं आकड्यांकडे वळू या. म्हणजे सूर्य किती मोठा आहे, पृथ्वीची आणि सूर्याची आकार, वस्तूमान इत्यादींची गंमतजंमत पाहू या!

सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या साधारण ११० पट जास्त आहे. सूर्याचा व्यास आहे, १३,९२,००० किलोमीटर आणि पृथ्वीचा साधारण १२,७०० किलोमीटर. सूर्याचं वस्तूमान आहे दोनावर तीस शून्य एवढे किलो, शास्त्रीय 'लिपीत' २×१०^३० आणि पृथ्वीचं आहे पाचावर २४ शून्य (५×१०^२४) एवढे किलो. आता आपण जर सूर्यावर उतरू शकलो तर आपलं वजन किती सूर्यावर किती भरेल? पृथ्वीवर आहे त्याच्या साधारण एक हजार पट. पृथ्वीवर गुरूत्त्वाकर्षणामुळे होणारं त्वरण (acceleration due to gravity) हे सरासरी ९.८ मीटर प्रति सेकंद-वर्ग (9.8 m/s^2) एवढं आहे. सूर्यावर हाच आकडा सरासरी पृथ्वीच्या चाळीस पट म्हणजे ३२४ मीटर प्रति सेकंद-वर्ग एवढं भरेल.

पण आता पाहू या सूर्याची घनता किती आहे ते! पाण्याची घनता आहे, साधारण १ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर. म्हणजे एक सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि उंची असणार्‍या खोक्यात संपूर्णपणे पाणी भरलं, तर त्या पाण्याचं वजन भरेल साधारण १ ग्रॅम. पृथ्वीची सरासरी घनता पाण्याच्या घनतेच्या साधारण साडेपाच पट आहे. आणि सूर्याची घनता पाण्याच्या दीडपट आहे. म्हणजे चमचाभर सूर्य, चमचाभर पृथ्वीपेक्षा हलका असेल. अर्थात, चमचाभर पृथ्वी आपल्याला हातात घेता आली तरी चमचाभर सूर्य आपल्याला हातात नाही घेता येणार, चमचा वितळेल!

1 comment:

  1. Very interesting information. Just saw one post today, will come back for the rest.

    ReplyDelete