Thursday, September 2, 2010

सूर्य - १५

सूर्याच्या आयुष्याबद्दल प्रश्न पाहिल्यानंतर आपण साधारण त्याच संदर्भातला पुढचा प्रश्न पाहू या:

सूर्यातील इतर जड मूलद्रव्ये कोणत्या स्वरूपात आहेत? वायूच ना? हैड्रोजनच्या चार अणूंपासून हेलियमचा एक अणू होतो. पुढे या हेलियमचे काय होते?

सूर्याचे इंजिन हायड्रोजनचे हेलियममधे रूपांतर करून चालते. ही प्रक्रिया अगदी सोपी नाही, आपण पुढच्या भागात त्याचीही माहिती करून घेऊ या. पण आत्ता पाहू या हा हायड्रोजन संपला तर काय होईल. साधारणपणे सूर्याच्या केंद्रात एकूण वस्तूमानाच्या १/६० एवढा हायड्रोजन आहे. त्याचे हेलियममधे रूपांतर होताना ऊर्जा बाहेर पडते. या ऊजेमुळे फक्त सूर्यात प्रचंड उष्णता आणि तापमान आहे असंच नाही तर या ऊर्जेमुळे सूर्याचा आकारही स्थिर रहातो. सूर्याच्याप्रचंड वस्तूमानामुळे तिथे गुरूत्त्वाकर्षणही प्रचंड जास्त आहे. या बलामुळे सूर्यातला वायू बाहेरून आत खेचला जातो. जर या बलाला विरोध करणारे कोणतेही बल (फोर्स) नसेल तर सूर्य काही क्षणांतच एका बिंदूएवढा होईल; पण असं होताना दिसत नाही. याचं कारण सूर्याच्या केंद्रातून बाहेर पडणारी ऊर्जा. या ऊर्जेमुळे जे बल उत्सर्जित होते त्यामुळे सूर्याच्या गुरूत्वाकर्षणाला विरोध होतो आणि सूर्याचा आकार बदलत नाही.

सूर्याच्या केंद्रात किती वस्तूमान आहे, एका सेकंदाला सूर्यात किती ऊर्जा तयार होते यावरून सूर्याचं अंदाजे वय समजतं. साधारण आणखी पाचशे कोटी वर्षांनी सूर्याच्या केंद्रातल्या सर्व हायड्रोजनचे हेलियममधे रूपांतर होईल. त्यानंतर हेलियमचं आणखी जास्त जड मूलद्रव्य, लिथियममधे रूपांतर होऊ लागेल. पण हे होताना सूर्याच्या केंद्राचा आकार थोडा कमी होईल आणि गाभ्यात आणखी जास्त दाब (प्रेशर) आणि तापमान निर्माण होईल. त्यामुळे हेलियमच्या 'ज्वलना'स सुरूवात होईल. तार्‍यांमधे अशी जड मूलद्रव्य लोखंडापर्यंत बनू शकतात. त्यापेक्षा जड मूलद्रव्य बनताना ऊर्जा बाहेर पडत नाही, तर बाहेरून पुरवावी लागते. सूर्याचा गाभा संपूर्ण लोखंडाचा बनला की आतून कोणतेही बल नसेल जे गुरूत्वाकर्षणाला रोखून धरू शकेल. पण हे सगळं होईपर्यंत सूर्य रक्तरंगी राक्षसी (रेड जायंट) तारा झाला असेल (याची आणखी सविस्तर माहिती आपण तार्‍यांच्या जीवनक्रमामधे घेऊच). आणि लोखंडी गाभ्याचा सूर्य हा मृत तारा म्हणवला जाईल.

1 comment:

  1. म्हणजे सूर्य कधीही कृष्णविवर होणार नाही.

    ReplyDelete