सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना साधारणपणे पट्टीचुंबकाशी करता येईल. त्यासाठी आपण सध्यापुरतं सूर्याचं वैचित्र्यपूर्ण परिवलन बाजूला ठेवू. साधारण पट्टीचुंबकाप्रमाणेच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राला दोन ध्रुव असतात, उत्तर आणि दक्षिण. सूर्याचे भौगोलिक ध्रुव किंवा ज्या काल्पनिक आसाभोवती सूर्य फिरतो, त्या आसाची दोन टोकं आणि चुंबकीय ध्रुव एकाच ठिकाणी असतील असं नाही. पृथ्वीच्याही बाबतीत भौगोलिक आणि चुंबकीय ध्रुव एकाच जागी नाहीत, दोन्हीमधे साधारण ११०० किमी एवढं अंतर आहे. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर गोलार्धात चुंबकीय दक्षिण ध्रुव आहे आणि दक्षिण गोलार्धात उत्तर ध्रुव. पण सूर्याची ध्रुवीयता पृथ्वीप्रमाणे स्थिर नाही. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र दर अकरा वर्षांनी दिशा बदलते, किंवा उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपलं स्थान बदलतात. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचं ११ वर्षांचं चक्र आहे, ज्यात ते नियमितपणे कमी-जास्त होत रहातं. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा सौर डागांची संख्या वाढते, खग्रास ग्रहणात सूर्याचं जे प्रभामंडळ दिसतं, ते खूप मोठं आणि वर्तुळाकार दिसतं, सूर्याकडून येणारी भारीत कणांची संख्या वाढते. जेव्हा हे क्षेत्र सगळ्यात अशक्त असतं तेव्हा सौर डाग कमीतकमी दिसतात, प्रभामंडळ दीर्घवर्तुळाकार दिसतं आणि सूर्याकडून येणारी भारीत कणांची संख्याही कमी असते. सॅम्युअल हेन्रिच श्वाब या शास्त्रज्ञाने सौर डागांच्या संख्येची नोंद ठेवून सर्वप्रथम हा शोध लावला.
इ. वॉल्टर आणि अॅनी माँडर या नवरा-बायको शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम सौर डागांची संख्या अक्षांशाप्रमाणे नोंदवून ठेवली. वर्षानुवर्ष हे काम करून डागांचे स्थान आणि संख्या या य-अक्षावर आणि काळ क्ष अक्षावर असा आलेख काढला, तेव्हा त्यांना त्यात फुलपाखरासारखा आकार दिसला. वरच्या चित्रात तीच आकृती दिली आहे. यात दर अकरा वर्षांनी होणारी सौरडागांच्या संख्येतली वाढ बघता येईल. शिवाय या आकृतीतून हे ही दिसतं की सौरडाग साधारण सूर्याच्या दोन्ही गोलार्धांच्या वीस अंशाच्या आसपास तयार होतात, आणि कालांतराने विषुववृत्ताच्या जवळ येऊन दिसेनासे होतात. सौरडागांच्या निर्मितीपासून नष्ट होण्यापर्यंतचा 'प्रवास' शोधल्याबद्दल या आकृतीला माँडरची फुलपाखराची आकृती असं नाव दिलं आहे.
sahich ahe ! agadi sopa karun sangate ahes aditi,
ReplyDeleteyachee ek changali lekamala hoil.
-anand