Tuesday, August 31, 2010

सूर्य - १३

आज आपण सूर्यासंबंधिच्या प्रश्नाचं उत्तर पाहू या. प्रश्न असा आहे:
सौरस्फोटातून बाहेर फेकली जाणारी उर्जा सूर्याच्या वातावरणाच्या बाहेर गेल्यानंतर तिचे काय होते? तीच गोष्ट चुंबकीय बलरेषा ताणल्याने बाहेर फेकल्या जाणाऱ्या वायूंची. हे वायू सौरमालेच्या वातावरणाचा भाग बनतात, हे ठीक. पण तेथे त्या वायूंच्या आणखी काही प्रक्रिया होतात का?सूर्याने बाहेर फेकलेल्या द्रव्याचा सूर्याभोवती एक कडं निर्माण करतात आणि या कड्याला हेलिओस्फिअर किंवा सूर्यमंडळाची सीमा म्हणता येईल. सूर्यातून फेकले गेलेले द्रव्य जिथपर्यंत पोहोचते ते हेलिओस्फिअर. सूर्यातून बाहेर फेकले गेलेले हे द्रव्य काही दशलक्ष किलोमीटर प्रति तास या वेगाने काही शे कोटी किलोमीटर (वेळेच्या भाषेत साधारण दहा हजार तास) प्रवास करते आणि मग या द्रव्याचा वेग मंदावतो. सूर्याच्या आजूबाजूला असलेल्या तार्‍यांमधूनही अशाच प्रकारे द्रव्य बाहेर टाकले जाते. दोन्ही बाजूंनी, खरंतर सूर्याच्या सगळ्याच बाजूंनी असे द्रव्य बाहेर पडत आहे, ज्याला आंतरतारकीय द्रव्य किंवा साध्या भाषेत तार्‍यांच्या मधलं वस्तूमान, द्रव्य असं म्हणता येईल, इंग्लिशमधे interstellar medium / ISM. या द्रव्यामुळे सूर्यातून बाहेर फेकल्या गेलेल्या द्रव्याचा वेळ हळूहळू कमी होतो, याला शास्त्रीय भाषेत termination shock म्हणतात; आणि ज्या ठिकाणी सूर्यातून बाहेर फेकलेले द्रव्य आणि आंतरतारकीय द्रव्य यांचा दाब समसमान होतो, प्रेशर एकसारखे होते, तिथे सूर्याची सीमा संपते. सूर्यातून बाहेर पडणार्‍या द्रव्याचा प्रवास तिथेच थांबतो. शास्त्रीय परिभाषेत याला बो शॉक Bow shock असं म्हणतात. सूर्याचा बो शॉक साधारण २३० खगोलीय एकक* अंतरावर आहे असं मानण्यात येतं.

वरच्या चित्रात सूर्याच्या सीमेचे कल्पनाचित्रं काढलेले आहे. चित्रात टर्मिनेशन शॉक आणि बो शॉक दाखवलेले आहेत.

*एक खगोलीय एकक = सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं सरासरी अंतर.

No comments:

Post a Comment