Saturday, August 14, 2010

अथ धुमकेतूपुराणं!

अथ धुमकेतूपुराणं!

धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो.

धूमकेतू म्हटला की आपल्या डोळ्यासमोर 'हॅले'चा धूमकेतू येतो. कारण पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणारा, नुसत्या डोळ्यांनी स्पष्ट आणि विलोभनीय दिसणारा आणि मनुष्याप्राण्यास आयुष्यात दोन वेळा बघता येऊ शकेल असा एकमेव धूमकेतू आहे हा! हॅले प्रमाणेच इतर सर्व धूमकेतू हे बर्फ धूळ आणि वायू यांच्या मिश्रणाने बनलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी मिळून धूमकेतूचे केंद्रक (nucleus) बनते. या केंद्रकाचा आकार साधारणपणे २०मी. (आजपर्यंत सापडलेला कमीत कमीत छोटा धूमकेतू) ते ३००कि.मी. (आजपर्यंत सापडलेला जास्तीत जास्त मोठा धूमकेतू) पर्यंत असू शकतो. हॅलेच्या धूमकेतूच्या केंद्रकाचा व्यास सुमारे १६कि.मी., तर हॅले-बॉप धूमकेतूच्या केंद्रकाचा व्यास सुमारे ५८कि.मी. आहे.

धूमकेतू हे सुद्धा सूर्यमालेचाच भाग आहेत. आता बाकी ग्रह आणि धूमकेतू यांत अनेक दृश्य फरक आहेत आणि अनेक तांत्रिक फरक देखील आहेत. त्यातलाच एक फरक असा की सूर्यमालेतील ग्रह हे साधारण वर्तुळाकार आणि पृथ्वीसापेक्ष समतल कक्षेत फिरतात, पण धूमकेतू असल्या ग्रह-कक्षेच्या नियमांचे बांधील नाहीत. ते सूर्याभोवती लंब-वर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि 'समतल' वगैरे गोष्टींना फाट्यावर मारतात. असे असले तरीही धूमकेतूसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी बांधलेले आहेत आणि म्हणूनच आपण हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी पाहू शकतो.

धूमकेतूच्या कक्षेबद्दल सांगण्याचा हेतू हा की धूमकेतूचा नैसर्गिक अविष्कार हा त्याच्या लंब-वर्तुळाकार कक्षेत दडलाय. धूमकेतू जेव्हा सूर्यापासून दूर असतो तेव्हा त्याच्यात आणि अवकाशातील इतर अ-ग्रहीय वस्तूंमध्ये फरक करणं मुश्कील होऊन बसतं. त्यावेळी त्याची निरपेक्ष तेजस्विता (absolute magnitude) ही साधारण +१० ते +१६ असते. तेजस्विता जितकी 'मायनस' तितकी ती जास्त असते आणि जितकी 'प्लस' तितकी ती कमी असते. आपला सूर्य -२६ तेजस्वीतेचा आहे. मानवी डोळ्यांनी कमीत कमी +६ तेजस्वितेचे ऑब्जेक्टस दिसू शकतात. आता इतक्या कमी तेजस्वितेचे हे धूमकेतू तर अतिशय ताकदवान दुर्बिणी घेऊनच बघावे आणि शोधावे लागतात. पण जसजसा धूमकेतू सूर्याच्या जवळ येऊ लागतो, सौरवात आणि किरणोत्सर्ग यामुळे त्यावरील बर्फ आणि वायूचे मिश्रण वितळू लागते, धूमकेतूच्या केंद्रकाभोवती तात्पुरते वातावरण निर्माण होते आणि पृष्ठभागावरील धूळ, बर्फ आणि वायू मिळून त्याला एक अतिशय सुंदर शेपटी दिसायला लागते. त्यावर कडी म्हणजे वायूंचे आयनीभवन (ionization) होऊन धूमकेतूला अजून एक शेपटी फुटते. या दोन शेपट्यांमध्ये फरक कसा ओळखायचा? तर, वायूंचे आयनीभवन होऊन बनलेल्या शेपटीला वस्तुमान नसल्यामुळे ती शेपटी थोडीशी फिक्कट आणि सरळ दिसते, तर धूळ, बर्फ, वायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली शेपटी ही किंचित वळलेली दिसते. तसेच प्रत्येक धूमकेतूची आयनीभवन झालेली शेपटी दिसेलच असे नाही, पण मुख्य शेपटी दिसतेच.

धूमकेतूंच्या शेपट्यांमधलं हे द्रव्य पुन्हा धूमकेतूबरोबर परत जात नाही, ते तिथेच रहातं. पृथ्वीच्या कक्षेतही असा "कचरा" आहे. पृथ्वी जेव्हा या द्रव्याच्या जवळ जाते तेव्हा गुरूत्वाकर्षणाने हे द्रव्य पृथ्वीकडे खेचलं जातं. हे कण पृथ्वीच्या वातावरणात शिरले की घर्षणातून उष्णता तयार होते आणि त्यामुळे हे कण जळतात. याच उल्का. विशिष्ट धूमकेतूंमुळे पृथ्वीच्या कक्षेत विशिष्ट ठिकाणी असा 'कचरा' आहे त्यामुळेच अमुक दिवशी अमुक दिशेने उल्कापात होईल हे सांगता येतं. (उदा. टेम्पल-टटल या धूमकेतूने करून ठेवलेल्या 'कचऱ्या'मुळे आपल्याला १० ते २२ नोव्हेंबर दरम्यान सिंह राशीतून होणारा उल्कापात दिसतो.)

धूमकेतूच्या भात्यातले धूळ, बर्फ वायू वगैरे दर वेळी असेच कमी होत जातात. काही वेळा बाह्य-परिणामांमुळेही असं होऊ शकतं. सौरवाताच्या जोरदार आघातांमुळे २००७ साली 'एन्के' धूमकेतूची शेपटी अशीच तुटून वेगळी झाली होती. धूमकेतूच्या वारंवार सूर्यभेटीमुळे त्यामधे फारसं धूळ, बर्फ, वायू वगैरे संपत जातात आणि उरतात ते बरेचसे दगड, पण त्यांच्यामुळे फार जास्त प्रकाश परावर्तित होत नाही आणि धूमकेतू साध्या लघुग्रहासारखाच दिसू लागतो.

धूमकेतू हे नेहेमी स्वत:च्या लंबवर्तुळाकार कक्षेत र्‍ह्स्वसंपात बिंदू (orbital Perihelion) ते दीर्घसंपात बिंदू (orbital Aphelion) असा प्रवास करतात. धूमकेतू जेव्हा त्याच्या र्‍ह्स्वसंपात बिंदूपाशी (कक्षेतील सूर्याच्या सर्वात जवळील बिंदू) पोहोचतो, तेव्हा साहजिकच धूमकेतूची शेपटी सर्वात लांब असते आणि तो अतिशय तेजस्वी दिसतो (उदा. हॅले-बॉप धूमकेतू). काही धूमकेतूंची आणि आपली भेट या र्‍ह्स्वसंपात बिंदूपाशी होत नाही. याचे कारण म्हणजे ते सूर्याच्या पलीकडे (पृथ्वी-सापेक्ष) गेलेले असतात, किंवा पृथ्वीची आणि धूमकेतूचा र्‍ह्स्वसंपात बिंदू एकाच पातळीत असतो. त्यामुळे धूमकेतू सूर्यात बुडून गेल्यासारखा वाटतो आणि दिसत नाही. पण हाच धूमकेतू सूर्यापासून किंचित लांब आला की काय फक्कड दिसतो महाराजा. (उदा. ह्याकुताके धूमकेतू).

या धूमकेतूंचे कक्षेप्रमाणे ३ प्रकार आहेत. १. र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतू, 2. दीर्घ-कक्षीय धूमकेतू आणि ३. अतिथी धूमकेतू
र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतू हे नावाप्रमाणेच छोटी कक्षा असणारे धूमकेतू आहेत जे साधारण 200 किंवा त्यापेक्षा कमी वर्षात सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करतात. गुरु ग्रह ते 'क्युपियर'च्या पट्ट्यापर्यंत यांची कक्षा असू शकते. तरीसुद्धा हे अंतर प्रचंड असल्याने धूमकेतू हे एका विलक्षण गतीमध्ये (ग्रहांच्या परिभ्रमणाच्या गतीपेक्षा कैक पटींनी अधिक) फिरत असतात हे लक्षात आले असेलच. ( क्युपियरचा पट्टा हा सूर्यमालेभोवती एका समतल कक्षेत पसरलेला अ-ग्रहीय वस्तूंचा पट्टा आहे. क्युपियर नावाच्या शास्त्रज्ञाने असा एखादा पट्टा सूर्यमालेभोवती असू शकतो याचे शास्त्राधारित भाकीत केले होते, त्यामुळे या पट्ट्याला त्याचे नाव दिले आहे.) बहुतांश र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतूंची निर्मिती ही या पट्ट्यात होत असावी असा एक निष्कर्ष आहे. पण इथेही हॅलेचा धूमकेतू त्याचे वेगळेपण दाखवून देतो. हॅलेच्या धूमकेतूचा आकार आणि वस्तुमान पाहता तो 'उर्ट'च्या मेघात निर्माण झालेला धूमकेतू असून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात अडकून र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतू झाला असावा असे मानण्यात येते. ('उर्ट' नावाच्या शास्त्रज्ञाने हा आंतरतारकीय मेघ अस्तित्वात असल्याचे सुचवले होते)

दीर्घ-कक्षीय धूमकेतू हे २०० वर्षांपेक्षा मोठी परिभ्रमणाची कक्षा असणारे धूमकेतू आहेत. हॅले-बॉप (१९९७), ह्याकुताके (१९९६), मॅकनॉट (२००७) हे प्रसिद्ध धूमकेतू याच प्रकारात येत असल्याने आणि यांची संख्या विशेष मोठी असल्याने हे कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहेत. दीर्घ-कक्षीय धूमकेतू 'उर्ट'च्या मेघात तयार होतात असाही एक निष्कर्ष आहे.

अतिथी धूमकेतू म्हणजे ज्या धूमकेतूंची कक्षा ही लंब-वर्तुळाकार नसून पॅराबोलिक (मराठी शब्द: अन्वस्ताकार) असते ते धूमकेतू! या पॅराबोलाच्या केंद्रस्थानी सूर्य असतो, आणि या केंद्रानुसार आखलेल्या बिंदुमार्गावरून हे धूमकेतू प्रवास करतात. हे धूमकेतू दिशा चुकून गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याकडे खेचले जातात आणि त्याला वळसा घालून निघून जातात. परंतु यांना दीर्घसंपात बिंदूच नसल्याने हे धूमकेतू सूर्याभोवती परिभ्रमण करत नाहीत.

असे हे धूमकेतू सर्वसाधारणपणे सूर्यमालेत येतात, आपले रंग-ढंग दाखवतात आणि सूर्याला प्रदक्षिणा घालून परत अंतराळात निघून जातात. पण प्रत्येक धूमकेतू हा स्वतंत्र असतो आणि प्रत्येकाची तऱ्हा निराळी असते. काही धूमकेतू हे नियमितपणे प्रदक्षिणा घालतात. काही धूमकेतू हजारो वर्षांची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा दर्शन देतात. काही धूमकेतूंच्या कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलतात. अनेक धूमकेतू ऊर्टच्या मेघातून निघताना अन्वस्ताकार वा अपस्ताकार (पॅराबोलिक अथवा हायपरबोलिक) कक्षेत असतात. असे सूर्याच्या दिशेने झेपावणारे धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याचीही शक्यता असते आणि त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होऊ शकते. पण यापैकी अनेक धूमकेतू गुरू किंवा शनी यांच्या गुरूत्वाकर्षणामुळे दीर्घवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरू लागतात. शुमाकर-लेव्ही९ नावाचा धूमकेतू असाच भटकताना गुरूच्या कक्षेत सापडला, बरीच वर्षे त्याच्याभोवती फिरला, आणि नंतर १९९४ मध्ये गुरु वर आदळून नष्ट झाला. धूमकेतू असे गायब होण्याचा पृथ्वीवरच्या जीवसृष्टीलाही फायदा होतो, झाला असावा; कारण गुरू-शनीमुळे जसे काही धूमकेतू दीर्घवर्तुळाकार कक्षेत येतात तसेच काही धूमकेतू सूर्यमालेतून बॅनही होतात; आणि ते पुन्हा सूर्यमालेकडे येऊ शकत नाही.



हेल-बॉप धूमकेतू (१९९७)


धूमकेतू ह्याकुताके (१९९६)



ह्याकुताके धूमकेतूचा सूर्यमालेतला मार्ग



मॅकनॉट धूमकेतू. २००७ साली आलेला हा धूमकेतू दक्षिण गोलार्धातून दिसत होता आणि त्याची शेपटी आकाशात कितीतरी अंशांवर पसरली होती जी ह्या चित्रात दिसत आहे.

इकेया-सेकी नावाचा धूमकेतू १९६५ साली आला होता, तो सूर्याच्या फारच जवळून गेला (साडेचार लाख किमी). सूर्याच्या एवढ्या जवळून जाताना तो प्रचंड तेजस्वी झाला होता आणि जपानमधून तो दिवसाउजेडी बघितला गेला. पण लवकरच त्याचे तुकडे होऊन तो धूमकेतू सूर्यात समाविष्ट झाला. असे अनेक धूमकेतू सूर्याजवळून जाताना सूर्यामध्ये खेचले जातात आणि नष्ट होतात. काही धूमकेतू अनंताच्या प्रवासाला निघून जातात. 'एन्के' सारखे धूमकेतू अतिशय वेगाने आणि अतिशय कमी वेळात प्रदक्षिणा पूर्ण करतात, पण त्यांचा वेग, वस्तुमान आणि अंत:स्थ ग्रहांना छेदून जाणारी त्यांची कक्षा यामुळे ते स्वत:चीच कक्षा आणि वेग बदलत राहतात.

अगदी 'मिपा'च्याच भाषेत सांगायचं झालं तर सर्व नियम पाळूनही दंगामस्ती करणारे, कुणालाही फाट्यावर मारायला कमी न करणारे, बेगुमानपणे टकरा देणारे, अगदीच कंटाळा आला तर चपला घालून चालू पडणारे हे धूमकेतू! इतका सगळं करूनही अतिशय प्रेक्षणीय असणारे हे धूमकेतू! त्यामुळेच आमच्यासारखे आकाशाकडे डोळे लावून बसणारे बापडे लोक यांच्या दर्शनाला अगदी म्हणजे अगदीच उत्सुक असतात!

इति धुमकेतूपुराणं!


पूर्वप्रकाशनः मिसळपाव. लेखक: असुर

5 comments:

  1. हा लेख मिपावर वाचला नव्हता. इथं वाचला. "क्या बात है!" असेच लेख वाचून वाटले.

    ReplyDelete
  2. धुमकेतू हे जिवसृष्टीचे वाहक म्हणून सुद्धा ओळखले जातात असे मी एका लेखात वाचल्याचे स्मरते. वातावरणाच्या अत्यंत उंचावरील विरळ थरांमध्ये आजपर्यंत न पाहिले गेलेले जिवाणू आढळल्याचे सुद्धा वाचले होते. त्याशिवाय पृथ्वीवर पुर्वीच्या काळी आलेल्या अनेक रोगांच्या साथी धुमकेतू दिसण्याच्या काळानंतर च आल्या असल्याबद्दलही काही ठिकाणी म्हंटले आहे. या सर्वात कितपत तथ्य आहे? किंवा या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे का? पाणी म्हणजे जीवन असे समीकरण असेल तर धुमकेतूमधील पाणी ग्रहांवर येउन पुढे जीवसृष्टी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते का? ( प्रश्न बाळबोध असल्यास क्षमस्व पण या विषयावरची जिन्यासू वृत्ती स्वस्थ बसू देत नाही :-) )

    ReplyDelete
  3. >>>धुमकेतू हे जिवसृष्टीचे वाहक म्हणून सुद्धा ओळखले जातात असे मी एका लेखात वाचल्याचे स्मरते. वातावरणाच्या अत्यंत उंचावरील विरळ थरांमध्ये आजपर्यंत न पाहिले गेलेले जिवाणू आढळल्याचे सुद्धा वाचले होते. <<<

    तुम्ही याचे संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे त्या त्या लेखकाने कुठल्या आधारावर किंवा कुठल्या काँटेक्स्टमध्ये हे म्हटले आहे हे पाहता येईल. सद्ध्यातरी याबद्दल 'पुराव्यानिशी शाबित' असं लिहिता येण्याइतपत पुरावा नाहीये.

    >>>त्याशिवाय पृथ्वीवर पुर्वीच्या काळी आलेल्या अनेक रोगांच्या साथी धुमकेतू दिसण्याच्या काळानंतर च आल्या असल्याबद्दलही काही ठिकाणी म्हंटले आहे. या सर्वात कितपत तथ्य आहे? किंवा या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे का? <<<

    अनेक योगायोग! योग्य निरिक्षणे करुन त्याचे चुकीचे संदर्भ जोडले जातात ते हे असे. धूमकेतू दिसण्याचा आणि पृथ्वीवर रोगांच्या साथी येण्याचा काहीही संबंध नाही. आणि प्रत्येक वर्षी अनेक धूमकेतू सूर्याला भेट देऊन जातात, त्यामुळे पृथ्वीवर होणार्‍या प्रत्येक घटनेचा संबंध त्यांच्याशी जोडला जाऊ शकतो, पण असा संबंध जोडणे बरोबर नाही. मंगळाचे भ्रमण आणि आपली युद्धे यांचा जसा संबंध नाही, तसेच!

    >>>पाणी म्हणजे जीवन असे समीकरण असेल तर धुमकेतूमधील पाणी ग्रहांवर येउन पुढे जीवसृष्टी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते का?<<<

    पृथ्वीवर (आणि आपल्या सूर्यमालेत फक्त पृथ्वीवरच) जीवसृष्टी का निर्माण झाली असावी याबद्दल अनेक तर्क आहेत त्यातलाच एक तर्क असा आहे की कुठल्यातरी धूमकेतूने 'कॅटॅलीस्ट'चे काम केले असावे. परंतु पुन्हा एकदा, या तर्काला शास्त्रीय आधार नाही. 'अनेक शक्यतांपैकी एक' असेच म्हणेन!

    >>>( प्रश्न बाळबोध असल्यास क्षमस्व पण या विषयावरची जिन्यासू वृत्ती स्वस्थ बसू देत नाही Smile ) <<<

    प्रश्न बाळबोध मुळीच नाहियेत! वरील उत्तरे आपणांस योग्य वाटतात की नाही हे कळवावे. त्यानुसार यावर अजून समाधानकारक लिहीता येईल का ते पहायला सोपे जाईल! धन्यवाद!

    असुर

    ReplyDelete
  4. >>>धुमकेतू हे जिवसृष्टीचे वाहक म्हणून सुद्धा ओळखले जातात असे मी एका लेखात वाचल्याचे स्मरते. वातावरणाच्या अत्यंत उंचावरील विरळ थरांमध्ये आजपर्यंत न पाहिले गेलेले जिवाणू आढळल्याचे सुद्धा वाचले होते. <<<

    तुम्ही याचे संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे त्या त्या लेखकाने कुठल्या आधारावर किंवा कुठल्या काँटेक्स्टमध्ये हे म्हटले आहे हे पाहता येईल. सद्ध्यातरी याबद्दल 'पुराव्यानिशी शाबित' असं लिहिता येण्याइतपत पुरावा नाहीये.

    >>>त्याशिवाय पृथ्वीवर पुर्वीच्या काळी आलेल्या अनेक रोगांच्या साथी धुमकेतू दिसण्याच्या काळानंतर च आल्या असल्याबद्दलही काही ठिकाणी म्हंटले आहे. या सर्वात कितपत तथ्य आहे? किंवा या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे का? <<<

    अनेक योगायोग! योग्य निरिक्षणे करुन त्याचे चुकीचे संदर्भ जोडले जातात ते हे असे. धूमकेतू दिसण्याचा आणि पृथ्वीवर रोगांच्या साथी येण्याचा काहीही संबंध नाही. आणि प्रत्येक वर्षी अनेक धूमकेतू सूर्याला भेट देऊन जातात, त्यामुळे पृथ्वीवर होणार्‍या प्रत्येक घटनेचा संबंध त्यांच्याशी जोडला जाऊ शकतो, पण असा संबंध जोडणे बरोबर नाही. मंगळाचे भ्रमण आणि आपली युद्धे यांचा जसा संबंध नाही, तसेच!

    >>>पाणी म्हणजे जीवन असे समीकरण असेल तर धुमकेतूमधील पाणी ग्रहांवर येउन पुढे जीवसृष्टी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते का?<<<

    पृथ्वीवर (आणि आपल्या सूर्यमालेत फक्त पृथ्वीवरच) जीवसृष्टी का निर्माण झाली असावी याबद्दल अनेक तर्क आहेत त्यातलाच एक तर्क असा आहे की कुठल्यातरी धूमकेतूने 'कॅटॅलीस्ट'चे काम केले असावे. परंतु पुन्हा एकदा, या तर्काला शास्त्रीय आधार नाही. 'अनेक शक्यतांपैकी एक' असेच म्हणेन!

    >>>( प्रश्न बाळबोध असल्यास क्षमस्व पण या विषयावरची जिन्यासू वृत्ती स्वस्थ बसू देत नाही Smile ) <<<

    प्रश्न बाळबोध मुळीच नाहियेत! वरील उत्तरे आपणांस योग्य वाटतात की नाही हे कळवावे. त्यानुसार यावर अजून समाधानकारक लिहीता येईल का ते पहायला सोपे जाईल! धन्यवाद!

    असुर

    ReplyDelete
  5. http://en.wikipedia.org/wiki/Jayant_Narlikar

    कदाचीत पुणे विद्यापीठ किंवा आयुका यापैकी एका ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात जयंत नारळीकरांच्या "वातावरणातील अत्युच्च थरांतील हवेचे नमुने घेउन त्यात सापडणा-या जीवांचा अभ्यास करण्याच्या" प्रयोगाबद्दलचा उल्लेख झाला होता व तसे सकाळ या वर्तमानपत्रात छापून आले होते. हीच गोष्ट वरिल 'विकिपेडीया' च्या जयंत नारळीकरांच्या पानावर उद्धृत केली आहे.

    करीअर शिर्षकाखालील शेवटून दुसरा परिच्छेद वाचावा व माझे निरीक्षण बरोबर आहे का हे कळवावे ही विनंती.

    ReplyDelete