Monday, August 23, 2010

उल्कावर्षाव!

लहानपणी आपण सगळेच आकाशातली एक 'स्पेशल' गोष्ट पाहून खूप खूष व्हायचो आणि लगेच डोळे बंद करून काहीतरी 'स्पेशल' मागायचो! आठवतंय का काय होती ती स्पेशल घटना? करेक्ट! आपण त्याला म्हणायचो 'तारा तुटला'. तुटणारा तारा ही इतकी विशेष घटना असायची की ते पाहिल्यावर काहीतरी बाप्पाकडे  'विशेष' मागायचं, आणि ते कधी खरं होईल याची वाट  पाहत बसायचं. अर्थात असं काही व्हायच्या आधीच अजून एखादा तुटणारा तारा दिसायचा आणि अजून काहीतरी मागणं व्हायचं.

असंच नाचत बागडत मोठे झालो, जरा थोडीफार अक्कल आली आणि यातला मजेचा भाग मागे पडून काही मस्त गोष्टी समजल्या. त्यातली पहिली भ्रमनिरास करणारी गोष्ट म्हणजे तारा कधीही तुटत नाही. तो बिचारा त्याचा त्याचा आयुष्य कंठत कंठत म्हातारा होतो, आणि 'ड्वार्फ', 'सुपरनोव्हा' वगैरे बनून गप पडून राहतो. तुटाबिटायच्या  भानगडीत तो काही पडत नाही. मग सहाजिकच प्रश्न पडतो की जर तारे 'तुटत' नाहीत तर मग ती तुटणारी आणि आकाशात जळत जाणारी वस्तू काय असू शकेल? आणि याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर ते आहे, 'उल्का'! पण 'उल्का' म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्या काही एकोळी धाग्यांप्रमाणे एका वाक्यात नाही देता येत. म्हणून 'उल्का म्हणजे काय' हे सांगायचा हा एक प्रयत्न.

उल्का म्हणजे अवकाशातील धूळ आणि दगड आणि अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्तू (uncertain non-planetary celestial objects). अवकाशातील या वस्तू काही कारणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात येऊन पृथ्वीकडे खेचल्या जातात. पृथ्वीकडे खेचले जाताना यांचा वेग प्रचंड वाढतो. त्यातच पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाच्या थरामुळे या वस्तूंचे प्रचंड घर्षण होऊन त्या पेटतात. आणि याच जळणाऱ्या उल्का आपण आकाशात पाहतो. या उल्का दिसतात सुद्धा खूप छान! काही नुसत्याच जळत जातात, काही रंगीबेरंगी दिसतात, काहींचा तर चक्क धूर सुद्धा दिसतो. अर्थात अश्या विविधतेसाठी वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तुमानाच्या उल्का हव्यात आणि कमीतकमी प्रकाशमात्रा असलेली मोकळी जागा हवी. घराच्या गच्चीवरून उल्का दिसल्या तरी बहार आहे.

आता अजून एक प्रश्न उभा राहतो की या वस्तू आकाशात येतात कुठून? उल्का बनवण्याचा सगळ्यात मोठा कारखाना म्हणजे धूमकेतू. गेल्या वेळी आपण येथे वाचलंच असेल की सूर्याजवळून जाताना कुठल्याही धूमकेतूला एक धूळ, दगड, वायू, बर्फ यांचे मिश्रण असणारी एक शेपटी फुटते. या शेपटीमधील द्रव्य धूमकेतू आपल्याबरोबर परत घेऊन जात नाही. हे द्रव्य धूमकेतूच्या कक्षेत तसेच पडून राहते. आणि धूमकेतू पृथ्वीची कक्षा छेदत जाऊन सूर्याभोवती स्वत:ची प्रदक्षिणा पूर्ण करीत असतो. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहिल्यास आपणास एक गोष्ट लक्षात येईल की अश्या एखाद्या धूमकेतूने मागे सोडलेला हा 'कचरा' त्याच्या कक्षेत पडून राहिलाय. पृथ्वी आपल्या नेहेमीच्या कक्षेत फिरत फिरत त्या ठिकाणी आली, की हा कचरा गुरुत्वाकर्षणामुळे  पृथ्वीकडे ओढला जातो. या कचऱ्यातल्या धुळीचा प्रत्येक कण हा वातावरणामुळे घर्षण होऊन पेटतो आणि आपल्याला झकासपैकी उल्का दिसते.

धूमकेतूची कक्षा ही साधारणपणे पृथ्वीच्या कक्षेशी काही अंशांचा कोन करून असते. या कोनामुळे धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेवर आपल्या कचऱ्यासाठी ठराविक जागा बळकावून ठेवतो. यामुळे होते काय, की जेव्हा जेव्हा पृथ्वी या धूमकेतूने कचरा केलेल्या भागात येते, तेव्हा आपल्याला आकाशात अचानक एकाच वेळी अनेक उल्का दिसतात. हाच 'उल्कावर्षाव'! हा कोन जितका काटकोनाकडे, तितका  हा उल्कावर्षाव जास्त नेमका असतो. म्हणजे जर धूमकेतूचा कचरा जर मोठ्या प्रमाणात विखुरलेला असेल, तर सहाजिक आहे की हा कचरा अतिशय विरळ असणार आणि एका वेळी होणारा उल्कावर्षाव हा तितकाच कमी!  पण हाच कचरा जर थोड्या जागेत पसरला असेल तर कचऱ्याची घनता जास्त असेल आणि आपल्याला एकाच वेळी अनेक उल्का दिसू शकतात.

वेगवेगळ्या धूमकेतूंनी पृथ्वीच्या कक्षेत अनेक ठिकाणी असे 'स्पॉट' बनवून ठेवले आहेत, त्यामुळे आपणास एका वर्षात अनेक वेळा उल्कावर्षाव पाहता येतो. पृथ्वीसापेक्ष अवकाशातून हा उल्कावर्षाव ज्या तारकासमुहातून  होतो असे दिसते त्या तारकासमुहाचे नाव त्या उल्कावार्षावास दिले जाते. उदाहरणार्थ, दर १० नोव्हेम्बर ते  २२ नोव्हेंबर दरम्यान होणारा उल्कावर्षाव हा टेम्पल-टटल या धूमकेतूमुळे होतो. परंतु पृथ्वीसापेक्ष हा उल्कावर्षाव सिंह राशीतून होतो असे वाटते, त्यामुळे हा उल्कावर्षाव सिंह राशीचा उल्कावर्षाव (Leonids meteor shower) म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी अशा उल्कावार्षावांची अनेक तांत्रिक निरीक्षणे घेतली जातात आणि त्यावरून त्यांचे विश्लेषण केले जाते ज्यायोगे धूमकेतू आणि त्यांचे उल्कावर्षाव यांच्यासंबंधी अधिक बारकाईने संशोधन होऊ शकेल.

ज्याप्रमाणे धूमकेतूंमुळे उल्कावर्षाव शक्य आहे, त्याप्रमाणे अजून एका कारणामुळे उल्का दिसू शकतात. हे कारण म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या संपर्कात येणाऱ्या अनेक अ-ग्रहीय वस्तू. यात अनेक उनाड दगड, धोंडे, लघुग्रहांच्या पट्ट्यातून सुटून आलेले छोटेमोठे लघुग्रह असतात. या असल्या उनाड वस्तू प्रेक्षणीय उल्का बनू शकतात. धूमकेतूच्या शेपटीमधली धूळ, दगड हे आकाराने काही विशेष मोठे नसतात. त्यातच पृथ्वीच्या वातावरणात सुमारे १००किमी  वरून जळत येताना या उल्का वातावरणातच संपून जातात. पण काही उल्का वातावरणाचा थर पार करून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. आणि विलक्षण वेगाने पृथ्वीवर आदळून एक मस्तपैकी मोठ्ठा खड्डा बनवतात ज्याला आपण 'क्रेटर' म्हणतो. (मराठीत याला 'विवर' असे म्हणू शकतो पण 'क्रेटर' शब्द एक सहीसही इफेक्ट आणतो, म्हणून क्रेटर!) असे क्रेटर बनवून घन स्थितीत शिल्लक राहिलेल्या उल्केला आपण 'अशनी' म्हणतो. पृथ्वीवर असे अनेक क्रेटर आपणास पहावयास मिळतील. त्यापैकी 'बॅरिंजर' हे सर्वात मोठे क्रेटर आपल्या हिरव्या नोटांच्या देशात, अ‍ॅरिझोना राज्यात आहे. भारतातसुद्धा एक क्रेटर आहे, तेही आपल्या महाराष्ट्रात. बुलढाणा जिल्ह्यात 'लोणार' येथे हे क्रेटर आहे. तसेच सायबेरियाच्या जंगलात १९०८ साली उल्का पडून एक मोठे क्रेटर तयार झाले आहे.

पृथ्वीला अशा मोठ्या उल्कांचा धोका जरूर आहे. त्यासाठी अवकाश-संशोधकांचे वेगवेगळे गट अशा छोट्या आकाराच्या अ-ग्रहीय वस्तूंचे सतत निरीक्षण आणि संशोधन करून या धोक्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. याच 'थीम'वर आधारित 'अर्मॅगडॉन' नावाचा एक इंग्रजी चित्रपट देखील आला होता. 'ब्रूस विलीस' नावाच्या अशनीसारख्या दिसणार्‍या एका टोण्याने त्यात काम केलंय.

पण, आपण धोके वगैरे सध्या बाजूला ठेवूयात, आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 'ओरीनीड्स' (मृग नक्षत्रातून होणारा उल्कावर्षाव) आणि नोव्हेंबर महिन्यातला 'लिओनीड्स' (सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव) यांचा 'लुत्फ' लुटूयात!
पूर्वप्रकाशनः मिसळपाव. लेखक: असुर

No comments:

Post a Comment