|
सूर्याचा पृष्ठभाग अतिशय जास्त प्रकाशमान असल्यामुळे सूर्याचे रंगावरण काही फिल्टर्सच्या मदतीशिवाय दिसू शकत नाही. हे फिल्टर्स एका विशिष्ट तरंगलांबीचे किरणच आपल्यापर्यंत पोहोचू देतात. रंगावरणात हायड्रोजनची विशिष्ट तरंगलांबी, किंवा एकाच रंगाचा प्रकाश, एच-अल्फा, जो लाल रंगाचा असतो, तो दिसतो. या फिल्टरने काढलेल्या चित्रांमधेही (डाव्या बाजूचे चित्र) काही काळे (तुलनेने थंड) आणि पांढरे (अतितप्त) भाग दिसत आहेत. एरवी फक्त ग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र सूर्याची तबकडी झाकतो, तेव्हा क्षणासाठीच रंगावरण दिसते (आणि नंतर चंद्र सूर्याच्या तबकडीवरून हटेपर्यंत सौर किरीटच दिसतो). उजव्या बाजूच्या चित्रात रंगावरण दाखवले आहे. त्यात सौर ज्वालाही दिसत आहेत.
रंगावरणाची जाडी साधारण दोन हजार किमी एवढी आहे. रंगावरणाचे तापमान साधारण ४५०० ते २०००० केल्व्हीन एवढे जास्त असते. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही रंगावरण जास्त तप्त असते पण फक्त रंगावरणाची घनता कमी असल्यामुळे पृष्ठभाग सहज दिसतो आणि रंगावरण बघण्यासाठी खास साधनं अथवा ग्रहणाची वेळ साधावी लागते. रंगावरणाचे तापमान एवढे जास्त का आहे याचा अजूनही नीट उलगडा झालेला नाही. पण चुंबकीय बल आणि वायूंमधे चुंबकीय क्षेत्र अडकून होणार्या परिणामांपैकी एक म्हणजे रंगावरणाचे जास्त तापमान यावर शास्त्रज्ञाचे एकमत आहे.
आता पुढच्या भागात आपण पाहू सौर किरीटाची माहिती.
No comments:
Post a Comment