Wednesday, August 25, 2010

सूर्य - १२


सौर वार्‍यांचा मोठा स्फोट म्हणजे सूर्याच्या किरीटातून प्रचंड प्रमाणात वायू बाहेर फेकला जाणे, इंग्लिशमधे याला करोनल मास इजेक्शन, CME म्हणतात. या नि:सारणामधे प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, छोट्या प्रमाणात जड मूलद्रव्य, उदा: हेलियम, ऑक्सिजन, इत्यादी आणि चुंबकीय क्षेत्र सूर्याकडून बाहेर टाकले जाते. वरच्या मूव्हीमधे दाखवल्याप्रमाणे अचानक प्रचंड प्रमाणात द्रव्य सूर्यातून बाहेर फेकले जाते जे आठ मिनीटांत पृथ्वीवरून दिसू शकते. पण हे द्रव्य पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. नक्की किती वेळ लागतो हे त्या स्फोटाच्या ऊर्जेवर अवलंबून असतं. अलिकडच्या संशोधनानुसार चुंबकीय रेषा जोडणीमुळे हे द्रव्यनि:सारण होते असे लक्षात आले आहे. चुंबकीय रेषा जोडणी म्हणजे नक्की काय? तर सूर्याच्या वैचित्र्यपूर्ण परिवलनामुळे सूर्याच्या चुंबकीय रेषा तुटतात हे आपण मागे पाहिलेच. कधीकधी या रेषांची पुर्नमांडणी होऊन, पुन्हा मोडणी-जोडणी होऊन उलट दिशा असणार्‍या दोन रेषा एकत्र आल्या की ही चुंबकीय रेषा जोडणी होते, ज्यात या दोन रेषांमधे असलेली ऊर्जा अचानक बाहेर पडते आणि आपल्याला स्फोटाच्या स्वरूपात दिसते.

या द्रव्यनि:सारणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र आहे. द्रव्यनि:सारणाचंही स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असतंच. ही दोन्ही चुंबकीय क्षेत्र एकमेकांना समांतर असली, किंवा दोन्हीचे समान ध्रुव एकाच दिशेला असले तर समान ध्रुवांमधे असलेल्या अपकर्षणामुळे हे सर्व द्रव्य पृथ्वीपासून लांब जाते, पृथ्वीवर फारसा परिणाम होत नाही. पण याच्या उलट स्थिती आली, विरुद्ध ध्रुव एका दिशेला आले तर हे द्रव्य पृथ्वीकडे खेचलं जातं. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव भौगोलिक ध्रुवांच्या जवळच आहेत, त्या दिशेला हे द्रव्य प्रवास करतं आणि तिथे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स जमिनीच्या जवळ येऊ लागतात. पृथ्वीच्या वातावरणाच्या एका थरात, आयनोस्फियरमधे या कणांची ऊर्जा नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे आयन्स शोषून घेतात आणि थोड्या वेळाने ही ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर टाकतात. त्यालाच ध्रुवीय प्रकाश किंवा ऑरोरा असे म्हणतात. खालच्या चित्रात असाच एक ऑरोरा दाखवला आहे. हे भारीत कण कृत्रिम उपग्रहांच्या जवळ आल्यास त्यांचे नुकसान करू शकतात, पृथ्वीवरच्या आयनोस्फियरला उलटंपालटं करत दळणवळणही बंद पाडू शकतात. म्हणून किरीटातून होणार्‍या या द्रव्य नि:सारणाचा अभ्यास करणे आपल्यासाठीही गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment